वयोवस्था शांती- (वयानुसार केल्या जाणाऱ्या शांत्या): आयुष्य म्हणजे इहलोकात राहण्याची कालमर्यादा, जीवनमर्यादा. ती पूर्वजन्मातील सकृत, दुष्कृत यानुसार विधाता परमेश्वराने गर्भावस्थेमध्ये असताना नियोजन केलेली असते.
जसे की आयुष्य, उद्योगधंदा, संपत्ती, द्रव्यलाभ, अन्न व मरण या सहा गोष्टी गर्भावस्थेतच ठरलेल्या असतात. यालाच आपण लल्लाट रेषा असे म्हणतो.
वेदाने मनुष्याची कलियुगातील आयुर्मर्यादा १०० ते १२० वर्षे ठरवून दिलेली आहे. आयुष्याच्या मुख्यत: तीन अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य, वार्धक्य.
जन्मत: २५ वर्षांपर्यंत बाल्य, ५० वर्षांपर्यंत तारुण्य व पुढील आयुष्य वार्धक्य मानले आहे. वार्धक्य अवस्थेमध्ये शरीराच्या ठिकाणी अनेक आघात, आजार, इंद्रिय वैफल्य (अवयवांची शक्ती कमी होणे) होण्याचा संभव असतो. उर्वरित आयुष्य सुखाने जावे म्हणून वयाच्या ५० वर्षांपासून दर ५ वर्षांनी वयोऽवस्थाशांती करावी, असे शौनक ऋषींनी सांगितले आहे.