वे.मु. अनंत पांडव गुरुजी

शनि साडेसाती

शनि म्हटल्यावर आठवते ती शनीची साडेसाती!

शनिच्या साडेसातीबद्यल जनमानसात अनेक प्रकारच्या गैरसमजूती पसरल्या आहेत. साडेसाती खरोखरच इतकी अशुभ असते का ? तर उत्तर असेल “नाही”. पण हा एक विशिष्ट प्रकारच काळ मात्र नक्कीच असतो, व त्याला थोड्या अध्यात्मिक दृष्टीनेही पहावे लागेल.

अध्यात्म ज्योतिषशास्त्रात शनिला कर्म विपाककारक ग्रह मानलेले आहे. शनिचे महत्वच असे आहे, इतर कोणत्याही ग्रहांचे महात्म्य वर्णन करणाऱ्या पोथ्या नाहीत केवळ शनि महात्म्यच अस्तित्वात आहे यातच सर्व काही आले.

  1. 1
    माहिती

    शनि हा पाप ग्रह समजला जतो तो भले करण्याऐवजी वाईटच जास्त करतो असे जे चित्र उभे केले आहे ते तितकेसे खरे नाही. थोडे निरिक्षण केल्यास हे दिसून येते की शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुध्द करणारा, मनातील घाण व कुविचार काढून टाकून उच्च प्रतिला घेऊन जाणारा ग्रह आहे. शनि हा गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणूसकी शिकवतो, अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो हा सत्यवादी पण निष्ठूर ग्रह आहे. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबध्द, विनयशिल व नम्र आहेत त्यांना उच्च पदाला घेऊन जातो तर जे अहंकारी, गर्विष्ठ व स्वार्थी आहेत त्यांना त्रास देतो. वास्तविक पाहता शनीची साडेसाती ही व्यक्तीला सहनशील, धार्मिक, दानशील व कर्मशील बनवते. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. याकाळात व्यक्तीला आपल्या परक्याची जाणीव होते. स्वत:चे गुण दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो. माणूसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.

    ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) व अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत पण शनिची फक्त एकच बाजू विचारात घेतली जाते म्हणूनच लोकांच्या मनात शनिविषयी भीती निर्माण होते.

  2. 2
    शनिचे गुण

    न्यायीपणा, क्षमाशील, नि:स्वार्थ, व्यवहारी, जबाबदारीची जाणीव, कडक शिस्त, वैराग्य, नम्रता, इंद्रायावर ताबा असणे, कष्टाळू, सहनशील, चिकाटी, विचारी, गंभीर, दयाळू, निष्ठावान, सेवावृत्ती, नीतीने वागणारा, कर्तव्यनिष्ठ, स्थिर, शुध्द नैतिक आचरण, कायद्याने वागणारा, विचारवंत, आशावादी.

  3. 3
    शनिची दोष

    अक्षमाशील, खूनशीपणा, क्रूर, निर्दयी, निरुद्योगी, निराशावादी, उदास, हटी दुराग्रही, चंचल, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, दुसऱ्यांची टिंगल- टवाळी करणारा, गलिच्छ- अस्वच्छ, अनितीने वागणारा, लाचार, जुगारी, दारूडा, नशा करणारा, व्यसनी, तामसी, पर निंदा करणारा, अस्थिर,बेकायदेशीर कर्म करणारा.

    ज्यावेळी आपण म्हणतो की, एखाद्याला शनि शुभ आहे तेव्हा त्याचा अर्थ असतो कि त्या व्यक्तित शनिचे गुण आहेत व ज्यावेळी म्हणतो की, एखाद्याला शनि अशुभ आहे तेव्हा त्याचा अर्थ असतो कि त्या व्यक्तित शनिचे दोष आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, शनिला शुभ, अनुकुल बनवायचे असेल तर आपल्या स्वभावात बदल घडवून शनिचे गुण अंगिकारले पाहीजेत. स्वभाव बदलणे हे १००% शक्य नसले तरी “बहुगुण: अल्पदोष:” हे तर करु शकतोच.

    वरील विवेचनावरुन हे लक्षात येते की साडेसाती म्हणजे एक सत्व परिक्षाच असते. साडेसाती म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे फळ मिळण्याचा कालखंड.

     जर आपण चांगले कर्म केले असतील तर साडेसातीच्या काळात भाग्योदय होईल, उत्कर्ष होईल, उच्च पद प्राप्ती होईल, आपण ठरवलेले ध्येय- लक्ष साध्य होईल आणि जर का वाईट कर्मे केली असतील अथवा हातून घडली असतील तर त्रास, नुकसान, अपयश सहन करावे लागेल, नोकरी व्यवसायात पिछेहाट होईल. मग या व्यक्तीनी अशा घटनानी खचून न जाता यातून काही बोध घ्यावा. इतकेच.

    साडेसातीच्या काळात अनेक उपाय सुचवले जातात, शनिमहात्म्याचे पठण, शनि स्तोत्रावे पठण, तीळ उडिद , कंबळ, छत्री यांचे दान, शनिचे दर्शन, शनि अथवा मारुतीला रुई व तेल वाहणे इ. व बरेच लोक ते करतातही. तसे पाहता तंत्र,मंत्र, दान,स्नान, होमहवन, पूजा अर्चा, अनुष्ठान उपवास जप तप हे सर्व बाह्य उपचार आहेत या साऱ्यांचा फायदा तेंव्हांच होईल जेंव्हा आपण आपल्या स्वभावात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करु. अन्यत: अंतर्मनाच्या शुध्दीशिवाय बाह्य उपचारांने काहीही होणार नाही. तसेच वरील बाह्य उपचार हे भक्तीभावाने व श्रध्देने व्हावेत केवळ साडेसातीच्या भीतीने नको. इतकेच…

    इति शुभं भवतु !

    Cart