प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे स्वतःच घर. प्राप्त झालेली वास्तू आपल्याला लाभणही तितकच महत्वाच आहे. त्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे फार महत्वाचे आहे. वास्तु निर्माण करताना किंवा वास्तुमध्ये पूर्वी निवास करणार्या व्यक्तिंद्वारे काही अपकर्म घडल्याने निर्माण झालेले जे दोष, बाधा इ. यांच परिमार्जन होण्यासाठी आपण राक्षोघ्न + वास्तुशांत करतो. वास्तुशांती करण्यासाठी वैशाख, पौष, फाल्गुन , श्रावण, मार्गशीर्ष, जेष्ठ, कार्तिक, माघ हे महिने योग्य आहेत. या महिन्यातील मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, स्वाती, शततारका, हस्त, पुष्य, धनिष्ठा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, ही नक्षत्रे योग्य होय. *रविवार व मंगळवार हे दोन वार मात्र वर्ज्य आहेत. वास्तुशांती तसेच गृहप्रवेश करण्यासाठी यजमानांच्या जन्मकुंडलीनुसार लाभणारा मुहूर्त घेणे जास्त हितावह आहे. वास्तु प्राप्त झाल्यावर त्यामधे सुख, शांती नांदावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपले प्रवेशद्वार कायम सज्ज असावे, यासाठी आपल्या घराचा दरवाजा मंगलचिन्हांनी सजवावा. कलश, कमळ, ध्वज, चक्र, छत्र, श्रीफळ, पाने, वेली यांचा वापर करून आपण आपल्या वास्तूचे मुख्यद्वार सुशोभित करू शकतो.