वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते, कानाच्या जागी मान असती, नाक गुडघ्यांवर असते तर काय झाले असते? शरीर विकृत दिसले असते. बरोबर ना ? वास्तुशास्त्राचेही तसेच आहे. वस्तूची नेमकी जागा, तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते.
हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकविसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय? कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तूच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे. देशातील अनेक मंदिरे, प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. वास्तूंमधील गुणदोषामुळे अनेक चमत्कारिक बाबी घडत असतात, त्याची कारणेही आपण देऊ शकत नाही. एखाद्या मोडकळीस आलेल्या घरात राहणारा माणूस कोट्यधीश बनतो आणि कोट्यधीश माणसाचे दिवाळे निघते, असे नेमके का होते, हे आपल्याला कळत नाही. याचे कारण वास्तुशास्त्र आहे.
हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही. स्पष्ट शब्दांत दिलेली उत्तरे आहेत. वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख-दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच.
आपण नेहमी पाहतो, काही घरांतील कर्ता पुरुष किंवा स्त्रीचा अचानक मृत्यू होतो. काहींच्या घरात नेहमी आजारणपणे चालत असतात. काहींची वंशवेल खुरटलेली असते. काही घरांत नेहमी पती-पत्नीत भांडणे होतात. काहींची मुले दिवटी निघतात. हे सगळे कशामुळे? याचे कारण वास्तुदोष आहे.