कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्यामध्ये येतात हा कालसर्पयोग. राहू या सापाचे मुख व केतू शेपटी असतो. हा योग आला की लोक अगदी घाबरून जातात. पूर्वजन्मातील पापांमुळेच हा योग येत असल्याची सामान्यजनांची धारणा आहे. या योगाने भविष्यात घडणार्या एखाद्या अनिष्ट घटनेची पूर्वकल्पना मात्र मिळू शकते. मात्र, हा योग ज्यांच्या कुंडलीत आहे, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना हवे ते साध्य करतात हेही तितकेच खरे आहे. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो, उच्चाधिकाराच्या जागा मिळतात. पण त्याच वेळी हा योग तीव्र स्वरूपात असेल तर भिकारी बनण्याची वेळही येते. खूप परिश्रम करूनही काहीही पदरात पडत नाही. मूल होत नाही किंवा मुलाबाळांचा आकस्मिक मृत्यू, लग्न न जमणे, घरात तणाव, व्यवसायात तोटा, धनप्राप्तीत अडथळा, खोटे खटले, मानसिक अशांतता या समस्या भोगाव्या लागतात. मागच्या जन्मी केलेली पापे या जन्मात भोगावी लागतात.
कालसर्पयोग घातक व अनिष्टदायी आहे. पण याचा अर्थ हा योग असणार्यांच्या आयुष्यात यश कधीच येणार नाही, असे नसते. हा योग असणारी मंडळीही यशस्वी ठरल्याची उदाहरणे आहेत. फक्त एवढंच की त्यांनाही या योगाचा त्रास सहन करावा लागतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन, प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड, अभिनेता राज कपूर, अशोक कुमार, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन, मोगल बादशहा अकबर, जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्या कुंडलीतही कालसर्पयोग होता. तरीही ही मंडळी एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचली.