वे.मु. अनंत पांडव गुरुजी

विवाह संस्कार

  1. 1
    मुहूर्त पूजन

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आई किंवा यजमानीन बाई व इतर सुवासिनी.)

    दरवाजात मंडप घालावा.

    वर/वधू त्यांचे आईवडीलांना सुवासिनीनी स्नान घालून, शुभ्र (नवीन किंवा स्वच्छ) वस्त्रं परिधान करून मळवट भरावा. या सर्वांच्या पायावर स्वस्तिक काढावे.

    घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचे चित्र काढावे अथवा लावावे. पिवळ्या कपड्याच्या पट्ट्या तयार करून त्यामध्ये लेकुरवाळी हळकुंड बांधावे. त्या पट्या स्तंभ, मृन्मयी कलश (माठ), मुसळ, जाते या सर्व उपकरणास ते बांधाव्यात.

    मृण्मयी कलश मंडपाच्या खांबाजवळ ठेवुन त्यात वर/वधू व त्यांच्या आईवडीलांनी पाणी भरावे. त्याच्यावर अजुन एक छोटा कलश स्थापन करावा. त्यासही पिवळा कपडा … बांधावा व पूजन करावे.

    पाच सुवासिनी महिलांनी वधु/वर तसेच यजमानांस औक्षण करावे.

    साहित्य : हळद, कुंकू, अक्षता, फुलं-तुलसी-दुर्वा-बेल, विड्याची पाने, आंब्याची डहाळी माठ, मुसळ, उखळ, जाते,दिवा,अगरबत्ती,गोड पदार्थ, मुंडावली, सुपारी, हळकुंड वस्त्रं, कलश, पुजेची भांडी व आसन.

  2. 2
    मुहूर्त करणे

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई व इतर सुवासिनी.)

    वर/वधु आणि त्यांचे आईवडील यांना घोंगडीवर/आसनावर/गालीच्यावर बसवून कोर्या टोपलीत गहू ठेवून त्या टोपलीची पुजा करावी. टोपलीत दोन मुसळ ठेवून त्याला पिवळा कपडा बांधतात. किमान ५ सुवासिनी मिळून जात्यावर हळद इ. विधी करतात. या प्रसंगी पारंपारिक पद्धतीने गाणी म्हणण्याची परंपरा आहे.

  3. 3
    देवप्रतिष्ठा / देवकस्थापना, ग्रहयज्ञ

    (सहभाग: वर/वधु , त्यांचे आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई व आत्या, मावशी.)

    हा कुलाचाराचा भाग आहे. प्रत्येकाचे देवक (दैवत) वेगवेगळे असू शकते. मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी देवकाची स्थापना व नवग्रहांचे हवन केले जाते. घरचा आहेर या विधीच्या वेळी केला जातो. याच दिवशी सुवासिनीना भोजन घालावे.

    साहित्य : यादीत दिल्याप्रमाणे.

    कार्यक्रमासाठी लागणारा अवधी – २.३० तास

  4. 4
    व्याही भोजन

    (सहभाग: वर/वधु पक्षाकडील महत्वाचे पाहूणे.)
    हा प्रकार विवाह पुर्व चार-पाच दिवस अगोदर असतो. वर आणि वधुपक्षाकडील दोनही आईवडलांचे एकत्र भोजनाचे आयोजन केले जाते. हा औपचारिक लौकीक विधी आहे. कार्यक्रमासाठी लागणारा अवधी – उभय पक्षाच्या सोयीनुसार

  5. 5
    वर प्रस्थान

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई , करवली व आमंत्रित पाहूणे.)
    मंगलवाद्याच्या घोषात वर वधुगृही जाण्यास निघतो त्यावेळी मुंडावळ बांधुन घरातील देवांस(देवक)विडा-श्रीफळ देऊन, वडीलधार्या व्यक्तींना नमस्कार करून प्रस्थान केले जाते. वरासोबत करवली हातात मंगलकलश व मंगलआरती घेऊन नवरदेवासोबत निघते. नवरदेवासोबत कट्यार अथवा शस्त्रं घेण्याची प्रथा बहुतांश ठिकाणी आहे. मुंडावळ मोत्यांचीच असावी. मोती हे रत्न चंद्राचे प्रतिनिधीत्व करते. वधू/वरांस मंगलप्रसंगी चंद्रबळ असणे आवश्यक असते. म्हणून विशेषकरून मुंडावळीचा वापर सर्वत्र सोबत असणे व्यावहारिक आहे. घरातुन बाहेर पडल्यावर वापरत असलेल्या वाहनांस श्रीफळ फोडावा. त्यानंतर ग्रामदैवत व हनुमान यांच्या मंदीरात जाउन विडा नारळ अर्पण करून नमस्कार करुन कार्यास निघावे. प्रवासाला निघाल्यावर ज्याठिकाणी गांव/नगर/शहराची हद्द संपते त्याठिकाणी एक श्रीफळ फोडावा. मंगलकार्यालयाच्या मुख्यप्रवेश द्वारावर वधुची माता व इतर सुवासिनींनी वरांचे औक्षण करुन स्वागत करावे.
    कार्यक्रमासाठी लागणारा अवधी – प्रवासासाठी लागणारा अवधी

  6. 6
    व्याही भेट

    वधू आणि वराकडील दोन्ही व्याही एकमेकांना भेटुन(अलिंगन देऊन) एकमेकांचे तोंड गोड(साखर किंवा मिठाई) करतात व श्रीफळं पान -सुपारी देऊन मानसन्मान करतात. याप्रसंगी उभयपक्षाकडील एक सारखे नातेवाईक जसे वधुचे काका-वराचे काका, मामा-मामा… देखील भेटण्याची परंपरा आहे. मात्र हा लौकीक भाग आहे . वधु-वरांचे वडीलांनी भेटणे व संमतीदर्शक वातावरणाची निर्मीती करणे हा
    या विधी मागील प्रमूख उद्देश आहे.

  7. 7
    सीमांतपूजन

    (सहभाग: वर, वराचे आईवडील,(असल्यास काकी(काकू), आजी… किंवा यजमान-यजमानीन, वधुची आई व वधुपक्षाकडील सुवासिनी)
    वधुची आई किंवा यजमान पत्नी कडून वराची आजी-आई-काकी(काकु) आणि नवरदेवाचे अतिथी स्वरूपात पाय धुवुन तिला साडीचोळी… देऊन सन्मानित केले जाते.
    कार्यक्रमासाठी लागणारा अवधी – १.३०तास

  8. 8
    वाग्दान विधी

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई व आप्तेष्ट.)
    हा विधी म्हणजे वधू आणि वरपक्षाने नवीन जोडले जाणार्या नाते संबंधाविषयी एकमेकांना दिलेले वचन असते. याविधीच्यावेळी देश-काल… पंचांग यांचे उच्चारण करून उभय पक्षाच्या कुलगोत्राचा उच्चार केला जातो. विधीसाठी यजमान म्हणून बसलेल्या व्यक्तीच्या पंजोबा-आजोबा-वडील अशा तीन पिढ्यांचा उच्चार करुन यांच्या कुळात जन्मलेला वर/ वधू यांचा विवाह निश्वित करण्याचा विधी व त्यानिमित्ताने कार्यनिर्विघ्नतेसाठी श्री गणपती- वरुणांची पुजा करत आहोत असा संकल्प केला जातो व ते विधी पार पाडले जातात. मुलीचे वडील मुलाच्या वडीलांना/यजमानाला वचन देतात की, कोणतेही व्यंग अथवा कलंक नसलेली माझी … नांवाने ओळखली जाणारी मुलगी देव-ब्रह्मण व अग्नि यांच्या साक्षीने …. नांवाने ओळख असलेल्या तुमच्या मुलास देतो (दान करतो) त्याचवेळी मुलाचे वडील / यजमान वचन देतात की, … आपण देत असलेल्या …. नांवाच्या मुलीसाठी माझ्या … मुलासाठी निश्चिंत असावे.

  9. 9
    हळदी समारंभ

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई व आप्तेष्ट.)
    घाना भरणेचेवेळी दळलेली हळद या विधीसाठी घेतात. गादी अथवा चादरीवर गव्हाचा चौक तयार करून त्याच्या चार कोपर्यावर चार व समोरच्या दिशेला एक असे पाच कलश ठेवून त्यात हळद, कुंकू, सुगंधीजल… भरतात आणि पाचही कलश एक ते पाच कलश धाग्याने एकमेकांस बांधतात.(कलशास धागा गुंडाळतात.) वर/वधु व त्यांच्या आईवडीलांना चौकावर बसवून त्यांना औक्षण करतात. हळद लाऊन मंगलस्नान घालतात. वधूला लाऊन जी हळद उरते तिला उष्टी हळद असे म्हणतात. ही उष्टी हळद नवरदेवाला लावायला पाठवतात. ही हळद वराचे आईवडील यांनाही लावतात आणि त्या तिघांनाही मंगलस्नान घालतात. उष्ट्या हळदी सोबतच तेल, उटणे, साबण, टॉवेल या नवीन वस्तु वधुकडून वराला पाठवले जाते.

  10. 10
    मिरवणूक

    (सहभाग: वर व सर्व पाहूणे.)
    वरपक्षाकडील नवरदेव , करवली,वरमाई सहित सर्वजण मिरणूकीत सामील होतात. वाद्यसंगीत- नृत्य … नी हा बहारदार व आनंदोत्सवात भर टाकणारा हा कार्यक्रम असतो. विवाहापुर्वी ही मिरवणूक हनुमंताच्या मंदीरात नेण्याची परंपरा आहे. मिरवणूक आल्यावर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वधू पक्षाकडील एक सुवासिन डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन ऊभी असेल ती वरास औक्षण करीलत्यावेळी तिला वराने यथाशक्ती रोख रक्कम व वस्त्रं द्यावे. वराच्या मामाने मुख्यद्वारापासून वराला विवाह वेदीपर्यंत घेऊन यावे.
    मुहूर्त : विवाह मुहूर्ताच्या अगोदर मिरवणुकीच्या वेळेचा अंदाज घेऊन सुरुवात करावी. मुहूर्ताच्या अगोदर किमान २० मिनिटं मंगलकार्यालयाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ पोहोचावे.

  11. 11
    गौरीहर पुजन

    (सहभाग: वधु , त्यांची आईवडील इतर सुवासिनी.)
    वधूपक्षाच्या निवासस्थानी अथवा मंगलकार्यालयातील निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी भिंतीवर आम्रवृक्ष काढावा (चंदन किंवा कुंकवाने) अथवा आंब्याची फांदी लावावी. जमीनीवर रांगोळी काढून चार कोनास चार कलश मांडावेत. त्या चारही कलशाला दोर्याने गुंडाळावे व त्यामध्ये पाटा, वरवंटा ठेवावा. नंतर एक वस्त्र आंथरून त्यावर तांदुळाचा ढीग(रास) घालावी. त्या ढीगावर शिवपार्वतीची प्रतिमा अथवा मुर्ती ठेवून त्यांचे पुजन करावे. पुजन संपन्न झाल्यावर वधूच्या पायाच्या आंगठ्यापासून डोक्यापर्यंत उंचीची दोर्याची वात (२७ पदरी) तयार करावी व ती वात दिव्यात प्रज्वलीत करून गौरीशंकराच्या पुढे लावावी. ब्रह्मण – सुवासिनीस भोजन घालावे. प्रत्यक्ष भोजन शक्य नसल्यास तसा संकल्प करावा. नंतर वधूने मंगलस्नान करून पिवल्या चालू वस्त्रं परिधान करावे. (पिवळ्या साडी नेसणे. ही साडी मामाकडील अथवा माहेरची असते.) कुंकवाचा मळवट, मुंडावळ व अलंकार धारण करून गौरीहर देवाच्या समोर बसावे. कुंकु, रक्तचंदन,फुलं, बेल, अक्षता देवांस वाहून “ देवी देवी सौभाग्य दे, येणार्या धन्याला उदंड आयुष्य दे “ असे म्हणत रहावे. हे पुजन विवाह वेदीवर येईपर्यंत करत बसावे.

  12. 12
    मधुपर्क

    (सहभाग: वर, वधूचे वडील किंवा यजमान.)
    या विधीमध्ये वधूचे वडील/यजमान वराला पुजन करतात. यावेळी जामाताचे(जावयाचे) आसन-पाद्य-अर्घ्य-वरदक्षिणा, अलंकार, गाय… आदि देवून त्यांस सन्मानित करतात.
    अग्निस्थापन वराने आचमन करुन विवाहासाठी साक्षी अग्निची स्थापना करावी.

  13. 13
    मंगलअष्टक

    (सहभाग: वर/वधु , दोह्नrकडचे मामा, करवली व पाहूणे.)
    दोन पाटावर तांदुळाचे स्वस्तिक काढुन ते पुर्व पश्चिम ठेवावेत. दोनही पाटांच्यामध्ये अंतरपाट धरावा. वधूला पुर्वेकडे वराला पश्चिमेकडे तोंड करून उभे करावे. वधूवराच्या मागे त्याचे मामा, करवली यांनी उभे रहावे. विवाहाच्यावेळी काही लौकीक लोकाचार असेल तर तो ध्यानात घ्यावा. किमान मुहूर्ताच्या अगोदर किमान १० ते १२ मिनिटे मंगलअष्टके म्हणायला सुरुवात करता येईल
    अशी योजना असावी. ८ मंगलअष्टके म्हणावीत. मंगलअष्टक सुरु असताना वधुच्या आईने तुळसीला पाण्याने अभिषेक करीत तुळशी जवळच थांबावे. अशीही परंपरा आहे. मुलिच्या विवाहाची अक्षता मुलीच्या आईच्या डोक्यावर पडू नये. अशी प्रथा असल्याचे ऐकायला मिळते.

  14. 14
    वरमालाअर्पण

    वधूने प्रथम वराला व वराने नंतर वधुला हार घालावा. वधुने वरांस नमस्कार करावा. करवलीनी
    दोघांना औक्षण करावे.
    अवधी : ३० मिनिटे

  15. 15
    कन्यादान

    (सहभाग: वर/वधु ,वधूचे आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई.)
    मंगळसूत्र धारण वराने वधुच्या गळयात मंगळसूत्र बांधावे.
    नववधूचे आगमन होते. वधू आणि वरांस समोरासमोर बसवून दोघांच्या हाताच्या औंजली एकत्र ठेवून दोघांच्या हाताच्या अंगठ्यास धागाबांधून मंगलवाद्य व मंत्रपाठाच्या स्वरात वधूवरांच्या बाजूने चार सुवासिनी स्त्रिया उभ्याकरून वधूवरांच्या हाताला बांधलेला धागा प्रदक्षिणा मार्गाने फिरवला जातो. नंतर सूत्र काढून हळकुंड त्या सूत्रात बांधुन वधु-वर एकमेकांच्या हातात बांधतात.

    वधुचे पिता / यजमान यावेळी संकल्प करतात की, माझी कन्या या वराबरोबर साहचर्याने वागून, धर्मप्रजा उत्पन्न करो, तिच्याद्वारा वंशाची वृद्धी होण्यासाठी तसेच माPया पितृगणांना शाश्वतिक ब्रह्मानंद सुख ज्यात आहे, अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती ह्वावी एवढ्याकरिता आणि कन्यादानाचे शास्त्रात उल्लेखिलेले फळ मिळण्याकरिता या वराकडून या कन्येच्या उदरी उत्पन्न संततीमुळे माझ्या पुर्वीचे १० पुरूष, नंतरचे १० पुरुष व एक मी अशा २१ पुरुषांच्या उद्धारासाठी ब्राह्मविवाह विधीने श्रीलम्क्षीनारायणाच्या प्रितिस्तव कन्येचे दान करितो. (यावेळी वधुपित्याने भांडी-गाई-म्हशी-हत्ती-घोडे-घर-शय्या-जमीनदासी- वस्त्रं-अलंकार इ. दान करावेत.) वरांस प्रार्थना करितो की, धर्म-अर्थ-काम या पुरुषार्थाचे आचरण तु या स्त्रीवाचून इतर कोणत्याही स्त्री समवेत करू नकोस. त्यावेळी वर सासर्यास प्रतिवचन देतो की हो माझे आचरण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच असेन.

  16. 16
    कंकण गणपतीपुजन

    वधूवरांच्या बाजूने चार सुवासनिच्या हातातील सूत्र काढुन त्याच्यात हUकुंड बांधुन ते वधूवरांनी पुजन करुन एकमेकाच्या हातात बांधावे. व त्यानंतर वराने वधुचा हात हातात घेऊन विवाह होमाच्या
    वेदीवर जावे.
    अवधी : १५ मिनिटे.

  17. 17
    विवाह होम

    (सहभाग: वर/वधु , वधूचा भाऊ, वराची बहीण)
    वराने संकल्प करावा की, माझ्या या विवाह अंगभुत-राष्ट्रभृत, जया, अभ्याता, लाज्या होम करतो. हे सर्व प्रकारचे होम पुर्ण करावेत. (या होमाच्या अग्निचे प्रज्वलन वराच्या बहिणीने करण्याची प्रथा आहे. तसेच लाज्या होमाच्यावेळी वधुचा भाऊ वधूच्या हातात लाह्या देऊन मगच आहुती केली जाते.)

  18. 18
    सप्तपदी पूजन

    होमाच्या उत्तर बाजूस एका पाटावर तांदुळाच्या ७ राशी घालून त्यावर ७ सुपार्या ठेवून वधुने त्याचे पुजन करावे. त्यानंतर पायाच्या अंगठ्याने त्यातील एकेक सुपारी उत्तर अथवा समोरच्या दिशेस ढकलावी.

    सप्तपदीच्या प्रत्येक मंत्राचा अर्थ:
    १. हे वरा, तुPयाकरिता मी मिष्ठान्न, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वगैरे योग्यकाली संपादन करीन व आज्ञेप्रमाणे वागेन.
    २. पवित्र श्रृंगार व भूषणे यांना धारण करणारी मी वाणी, मन,देह,कर्म यांनी आपल्या आज्ञेबाहेर केव्हाही जाणार नाही.
    ३. मी मनाने अत्यंत पवित्र राहून तुझ्यासोबत सुखदु:खाची वाटेकरी होईन.
    ४. तुझ्यासोबत श्रौत -स्मार्त क्रमाणे यज्ञादि धार्मिक कृत्ये करीन.
    ५. गृहस्थाश्रमात तुला सहाय्य करून तुजबरोबर सुखदु:ख भोगीन व वंशविस्तार करीन.
    ६. दारिद्र व त्यासारखी सर्व दु:खे, मंगलकार्य व त्यासारखी सर्व सुखे, सुखदु:खात मी तुला सहाय्य करणारी म्हणुनच तुझी मित्र आहे.
    ७. हे वर कर्मसाक्षी देवांनी मजकरिता तुला माझा पती व स्वामी म्हणून समर्पण केले आहे. तेव्हा तू मला वंदनीय आहे.

    8

  19. 19
    सिंदुरदान

    वधूच्या भांगात वर शेंदुर भरतो. सौभाग्याची आठवण म्हणून यानंतर वधू कायम शेंदूर भांगात भरते. माझ्या सहस्त्रार चक्रावर व आज्ञाचक्रावर केवळ माझ्या पतीची आज्ञा व त्याचाच ध्यास मला राहो हा पतिव्रताधर्म पाळण्यास सुरुवात करते. कोणत्याही कामी एकसूत्री निर्णय असावा त्याने गृहस्थाश्रम धर्मात अडचणींना सामोरे जाण्यास मदत होते हा भाव या आणि अशा विधीमध्ये असतो. (केवळ पुरुषी संस्कृती म्हणून किंवा आम्ही काय कमी या अहंकारामुले असंख्य कुटुंब उध्वस्त झाल्याच्या घटना आज अनुभवतो यामागचे मुळे कारण एकी नसणे किंवा विशिष्ट पद्धतीचा अहंकार असणे हे आहे. निष्ठा राहीली तर बरेच अनर्थ टळू शकतात तसेच समाजात कौटुंबिक पातळीवर आदर्श म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होते. हा हेतू सौभाग्याच्या प्रत्येक अलंकारामागे आहे. तसेच हिंदू धर्मातील प्रत्येक विधी मागे विज्ञान असतेच हे नि:संकोचपणे मान्य करायलाच हवे.)

  20. 20
    कानपिळणे

    हा लौकीक विधी आहे. मुलीचा भाऊ लाज्या होमानंतर वराचा उजवा कान पिUतो आणि त्याला बहीणीचा व्यवस्थित सांभाळ कर अशी सूचना करतो. यावेळी वरपक्षाकडून वधूच्या भावाला मानपान दिला जातो.

  21. 21
    सुनमुख पहाणे

    (सहभाग: वर/वधु , वराची आई , आजी, काकी(काकू)…)
    ऐरणी पुजन झाल्यावर वधू आणि वर दोघेही वर मातेच्या दोन्हीमांडीवर दोघे बसतात. त्यावेळी वरमाता वधुवरांचा चेहरा एकत्रितपणे आरशात पहाते. त्यानंतर नववधूस अलंकार वस्त्रं… देते. धृव दर्शन वैवाहिक जीवनात स्थैर्य लाभावे यासाठी नववधुवर धृवाचे पुजन करतात. ज्याप्रमाणे धृव तारा आपले स्थान सोडत नाही स्थिर रहातो. तसे या नववधुचे पतीपत्नी नाते स्थिर असावे हा अर्थ या पुजनामागे आहे.

  22. 22
    ऐरणी पूजन (झाल पूजन, साडे भरणे/फळ भरणे)

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई व दोन्ही परिवार) या पुजनाचे वेळी वधू-वरांकडील यजमानासह सर्व उभयपरिवार एकत्र बसून हे पुजन केले जात. वधूचे वडील / यजमान संकल्प करितात की, वधूवरांस दीर्घायुष्य, वंशवृद्धी या फळांसाठी उमामहेश्वर प्रितीस्तव वरमातेस ऐरणी पुजन करून प्रदान करतो. (वेळूची टोपली किंवा पितळेची/तांब्याची परात त्यात वडे,पापड, कुरडई, तांदूळ, डाळ, कच्चे व पक्वान्न, कनकेचे १६ दिवे, वाग्दानविधीच्या वेळी बांधून ठेवलेले हळकुंड व सुपारी ठेवून त्याची पुजा करतात.) वधुच्या पित्याने/यजमानाने वर मातेच्या हातावर अक्षता, पुष्प देऊन दक्षिणेसह ऐरणी वंशपात्र हे वरमाते तुला प्रदान करतो, त्यावर माझा काहीही अधिकार नाही असे म्हणावे. (यावेळी वराच्या आईस श्रृंगार(वस्त्रं-अलंकार) देऊन सन्मान करावा. वराकडील कुटुंबियाना देखील मानपान करावा.) वराच्या यजमानास वधुपित्याने संवाद करावा की, हिच्या जन्मापासून आज या क्षणापर्यंत
    पुत्राप्रमाणे पालन केलेली ही कन्या तुमच्या पुत्रास दिलेली आहे. तिचे स्नेहाने पालन पोषण करा. असे बोलून वधुपित्याने/यजमानाने वधू वरपित्यास सोपवावी. व वराच्या आईस विनंती करून सांगावे की, ही आज तुम्हाला दिलेली माझी कन्या मित्र,बंधू, बांधव सोडून तुमच्या घरी येत आहे. तीचे अतीस्नेहाने पालन करा.नंतर मुलास प्रार्थना करावी की, हे वरा तुला स्वदेशी आणि परदेशी सहाय्य करणारी तुPयासाठी योग्य कन्या आहे. तीचे व्यवस्थित पालन पोषन कर. हा विधी झाल्यावर ब्रह्मण भोजन व दक्षिणेचा संकल्प करावा.

  23. 23
    देवक दर्शन व प्रस्थान

    हे विधी पार पडल्यानंतर विवाह वेदीवर येताना नवरीने ज्याठिकाणी गौरीहर पुजन केलेले आहे तिथं वधूवर एकत्रित जातात. वर देवाच्या समोर बसतो ,त्याच्या हातात वाटी किंवा पात्रामध्ये दुध पाणी दिले जाते. वधू वराच्या मांडीवर उजवा पाय ठेऊन समोर मांडलेल्या आंब्यावर वराच्या हातातील दुधपाणी शिंपडते. नंतर दोघही देवांना नमस्कार करतात. तेथून अन्नपुर्णा व बाळकृष्ण उचलुन घेतात आणि वडीलधार्या व्यक्तींना नमस्कार करतात. तिथून लगेचच मुलगा आपल्या घराकडे यायला निघतो.

  24. 24
    गृहप्रवेश

    (सहभाग: वराकडील उपस्थित सर्व नातेवाईक.)
    वरात घरी येताच वधुवरांवरुन दहीभात किंवा पोळी/भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळून टाकतात. दरवाज्याच्या बाहेर परातीत कुंकवाचे पाणी भरून ठेवतात. दरवाज्याच्या बाहेरपासून घराच्या आतील भागापर्यंत सफेद कपडा आंथरून ठेवतात. उंबरठ्यावर तांदळाचे भरलेले माप ठेवतात. नववधुचे पाय परातीतील कुंकवाच्या पाण्याने भिजवतात. त्याकुंकवाच्या रंगीत पायाचे ठसे(लक्ष्मीची पाऊलं) दरवाज्यात आंथरून ठेवलेल्या कपड्यावर उमटवत दरवाज्यात ठेवलेले माप ओलांडुन घरात प्रवेश करावा. प्रवेश केल्यानंतर घरात लक्ष्मीपुजन करावे.नवीन सुनबाईला नवीन नांव ठेवायचे असल्यास लक्ष्मीपुजन करून तिला गोड नैवेद्य दाखवतात. नवरामुलगा प्रथम नाम देवतेचे पुजन करून नवरीला नवीन नांवाने आवाज देतो. (नांव घेतो) त्यावेळ पासून नवरीला त्या नवीन नांवाने ओळखले जाते.

  25. 25
    देकोत्थापन

    (सहभाग: वर/वधु , त्यांची आईवडील किंवा यजमान-यजमानीन बाई )
    विवाहापुर्वी स्थापना केलेले देवकाचे उत्तरपुजन करावे.

    Cart